Skip to main content
पुरंदरच्या अंजीर पिकावर नव्या तांबेरा रोगाचा धोकारोगास कारणीभूत रोगकारकाची संशोधकांकडून ओळख सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर परिसरातील अंजीर बागांमध्ये आढळणाऱ्या तांबेरा रोगास कारणीभूत असलेल्या रोगकारकाची ओळख पीडीईएच्या वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या डॉ. विद्या पाटणकर आणि पीएच.डी. संशोधक प्राजक्ता कुलकर्णी यांनी चार वर्षांच्या अभ्यासातून पटवली आहे. या रोगकारकाचे नाव Phakopsora nishidana असे निश्चित करण्यात आले आहे.रोगाची सुरुवात पानांच्या खालच्या बाजूस लालसर-नारिंगी डागांनी होते. पुढे पाने वाकणे, अकाली गळणे आणि फळधारणेत घट अशी लक्षणे दिसून येतात. १०० अंजीर बागांच्या सर्वेक्षणात ७५ टक्के बागांमध्ये तांबेरा रोगाची लागण आढळली, तर ८७ टक्के शेतकऱ्यांनी बुरशीजन्य रोगांमुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याचे सांगितले.तीव्र प्रादुर्भाव झालेल्या बागांमध्ये दरवर्षी प्रति एकर सुमारे ११ हजार रुपयांचे उत्पादनमूल्य कमी होऊ शकते, तर सरासरी शेतस्तरीय नुकसान सुमारे ४७,३०० रुपये असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. या अभ्यासात P. nishidana चा पहिला संपूर्ण जीनोम क्रमही तयार करण्यात आला असून, भविष्यात रोगप्रतिकारक अंजीर वाण विकसित करण्यास आणि प्रभावी रोगव्यवस्थापनास त्याचा उपयोग होऊ शकतो.शेतकऱ्यांनी बागांची नियमित पाहणी करावी, जास्त बाधित पाने व फांद्या काढून नष्ट कराव्यात, छाटणी करून बागेत हवा खेळती ठेवावी आणि पानांवर दीर्घकाळ ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच बुरशीनाशकांची फवारणी करावी. ढगाळ व दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.या संशोधनासाठी स्थानिक अंजीर उत्पादक, पुरंदर हायलँड्स आणि समन्वयक रोहन उर्सल यांनी क्षेत्रीय पाहणीस सहकार्य केले. सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील डॉ. महेश धार्णे आणि डॉ. सय्यद दस्तगीर यांनी जीनोम विश्लेषणात योगदान दिले. वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, माजी प्राचार्य पंडित शेळके या संशोधनाला पाठिंबा दिला. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुनेत्रा वहिनी अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घागडे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख आणि उपसचिव एल. एम. पवार यांनी संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करून भविष्यातील संशोधनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. हे संशोधन शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment