Skip to main content
कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांचा पुणे आवारात भावपूर्ण सदिच्छा समारंभप्रशासकीय कर्मचारी व शिक्षकांशी स्वतंत्र संवाद; विद्यापीठाच्या विकासातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या यशस्वी कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पुणे आवारात त्यांच्या सन्मानार्थ भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले. महिला शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नावीन्य, कौशल्यविकास, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या गतीबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू प्रा. चक्रदेव यांनी पुणे आवारातील प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजापासून संस्थेच्या व्यापक प्रगतीपर्यंत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर त्यांनी शिक्षक व प्राध्यापकांशी स्वतंत्र संवाद साधत बदलत्या उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, संशोधन, नावीन्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.यानंतर आयोजित सदिच्छा समारंभास ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, श्री. शिरीष चक्रदेव, पुणे आवार समन्वयक डॉ. गणेश चव्हाण यांच्यासह व्यवस्थापन परिषद व अधिसभेचे सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रा. चक्रदेव यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळातील विविध उपक्रम आणि विद्यापीठाला मिळालेल्या विकासाच्या नव्या दिशेचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः’ या विद्यापीठाच्या ब्रीदवाक्यातील मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून महिला सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास, उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.विशेषतः पुणे आवाराच्या विकासासाठी त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या चालनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मृतींशी संबंधित वारसा जतन करण्याचे प्रयत्न, चेतना केंद्र, ITEP सारख्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना चालना, संस्कृती व्याख्यानमाला, विद्यार्थिनींसाठी अभिव्यक्ती कट्टा, वसतिगृहांचे नूतनीकरण तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाला दिलेले प्राधान्य यांचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.पुणे आवार समन्वयक डॉ. गणेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना प्रा. चक्रदेव यांच्या नेतृत्वातील सकारात्मकता आणि व्यक्तीची क्षमता ओळखून जबाबदारी देण्याच्या गुणाचा विशेष उल्लेख केला. “पदाचा कार्यकाळ संपतो; प्रभावाचा नाही. जबाबदारीचा कार्यकाळ संपतो; नात्याचा नाही. नेतृत्वाने निर्माण केलेली कार्यसंस्कृती ही कोणत्याही कार्यकाळापुरती मर्यादित नसते,” अशा शब्दांत त्यांनी कुलगुरूंच्या योगदानाबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यांच्या नेतृत्वातून सुरू झालेल्या आणि नियोजित असलेल्या विकासकामांना त्याच सकारात्मकतेने पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.कुलगुरू प्रा. चक्रदेव यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या प्रगतीचे श्रेय हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी आणि विद्यापीठाशी जोडलेल्या प्रत्येक घटकाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले. विद्यार्थिनींना सक्षम, आत्मनिर्भर आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनविणारे शिक्षण देण्याची विद्यापीठाची परंपरा अधिक समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.उपस्थित मान्यवर, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या सदस्यांनी प्रा. चक्रदेव यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदिच्छा, कृतज्ञता, आठवणी आणि विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या संकल्पाचा भाव अशा वातावरणात हा समारंभ संपन्न झाला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment