Skip to main content
लघुपटातून हवामान बदल आणि पुराच्या संकटाची विद्यार्थ्यांना जाणीववाघीरे महाविद्यालयात भूगोल विभाग व फिल्म क्लबतर्फे विशेष लघुपट व चर्चासत्र सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील भूगोल विभाग व ‘फिल्म क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचे दूरगामी परिणाम याविषयी विशेष लघुपट प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी हिमनदीमुळे नदीचा प्रवाह अडवला गेल्याने नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. तुषार घोरपडे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “चित्रपटांच्या माध्यमातून भौगोलिक घडामोडी आणि नैसर्गिक आपत्ती समजून घेणे अधिक प्रभावी ठरते. पूर या समस्येकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता, त्यामागील मानवी हस्तक्षेप, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन समजून घेणे गरजेचे आहे.” दाखविण्यात आलेल्या माहितीपटातून अतिवृष्टी, ढगफुटी, नद्यांवरील अतिक्रमणे, अनियोजित शहरीकरण आणि अयोग्य शहर नियोजन यांसारख्या पुराच्या विविध कारणांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्कालीन मदतकार्य, सुरक्षित स्थलांतर आणि पुनर्वसन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.लघुपटाच्या प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी विशेष चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पूरस्थितीचे पर्यावरण, मानवी जीवन आणि सामाजिक व्यवस्थेवर होणारे परिणाम याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, नियोजनबद्ध विकास आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या उपक्रमास भूगोल विभागातील प्रा. स्वाती भोसले, प्रा. सागर भोसले, प्रा. मनोज बोदरे, प्रा. रूपाली साठे, प्रा. कपिल कांबळे, प्रा. करिश्मा बरकडे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment