Skip to main content
एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालयामध्ये ‘दीक्षारंभ २०२६’ला उत्साहात सुरुवात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालय, पुणे येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी आयोजित ‘दीक्षारंभ २०२६ – Student Induction Programme (SIP)’ ला आज उत्साहात सुरुवात झाली. १० ते १४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींना महाविद्यालयीन वातावरण, अभ्यासक्रम, विविध उपक्रम व उपलब्ध संधींची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि सर्वांगीण विकासाची जाणीव निर्माण करणे हा आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध लेखक, ब्रँड कन्सल्टंट, कॉपीरायटर व भारतीय इतिहास-संस्कृतीचे अभ्यासक अभिजित जोग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पिढींच्या लेबल्समध्ये स्वतःला मर्यादित न ठेवता स्वतंत्र विचार, स्वतःची ओळख आणि भारतीय संस्कृती व मूल्यांशी नाते जपण्याचे आवाहन केले. इतिहासातील महिलांच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.यानंतर ‘Building Healthy Habits – आरोग्यदायी सवयींची जडणघडण’ या विषयावर न्यूट्रिशनिस्ट श्रीमती अमिता गद्रे यांनी मार्गदर्शन केले. संतुलित आहार, पौष्टिक नाश्ता, पुरेशी झोप, शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच मोबाईल व डिजिटल साधनांचा मर्यादित वापर याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, “दीक्षारंभ हा केवळ महाविद्यालयीन जीवनाचा प्रारंभ नसून स्वतःला ओळखण्याचा, नव्या संधी शोधण्याचा आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचा प्रवास आहे. विद्यार्थिनींनी प्रत्येक सत्रात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा,” असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या समन्वयक अनुजा किणीकर यांनी दीक्षारंभ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या या दोन सत्रांमुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी आणि सकारात्मक सुरुवात झाली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment