Skip to main content
वाघिरे महाविद्यालयात ‘कथा अभिवाचन’ कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील पुरंदर कलामंच व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी ‘कथा अभिवाचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मराठी कथासाहित्याचा परिचय व्हावा, कथा या साहित्यप्रकाराचे स्वरूप समजावे तसेच साहित्याचा आस्वाद घेण्याची आणि कलात्मक अभिव्यक्तीची क्षमता विकसित व्हावी, हा कार्यक्रमाचा उद्देश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते साहित्य न वाचता विविध साहित्यकृतींचा आस्वाद घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.यावेळी प्रसिद्ध अभिवाचक स्नेहल देशपांडे यांनी शंकर पाटील यांच्या ‘नाटक’ या कथेचे प्रभावी अभिवाचन केले. आवाजातील चढ-उतार, संवादफेक, विराम आणि ग्रामीण भाषेची लय यांचा सुरेख वापर करत त्यांनी कथानकातील विनोद व व्यक्तिरेखा जिवंत केल्या. अरविंद इंदलकर यांनी शंकर पाटील यांच्या ‘धिंड’ या कथेचे अभिवाचन केले. त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणातून ग्रामीण जीवन, पात्रांचे संवाद, विनोद आणि कथेतील सामाजिक आशय यांचा प्रभावी प्रत्यय उपस्थितांना आला.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी कथेमध्ये जीवनातील संघर्ष आणि विविध पैलू कलात्मक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता असते, असे सांगितले. अभिवाचन व साहित्यचर्चेमुळे विद्यार्थ्यांची ऐकण्याची क्षमता, आकलनशक्ती आणि भाषिक अभिव्यक्ती विकसित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा साहित्याशी प्रत्यक्ष संवाद घडतो आणि मराठी साहित्याकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होते, असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, मराठी विभागप्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे, प्रा. सुभाष नप्ते, संजय काटकर, नाचू आनंदे, पुरंदर कलामंचचे पदाधिकारी व सदस्य तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय फटांगडे यांनी केले, तर आभार डॉ. किरण गाढवे यांनी मानले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment