Skip to main content
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार 'जन्मभूमी वर्धा... कर्मभूमी पुणे' या नात्याला मायेची ऊब माईंची २७ वर्षांची सेवा परंपरा आजही अखंड सुरू 'विठ्ठल भक्तीला माणुसकीची जोड' प्रेमळ पाहुणचारातून जपला माईंच्या संस्कारांचा वारसा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी जपलेली हीच मानवतेची परंपरा आजही त्यांच्या संस्थेत तेवढ्याच प्रेमाने आणि आत्मीयतेने जोपासली जात आहे. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-२०२६ निमित्त आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या तब्बल ३०० वैदर्भीय वारकऱ्यांचे सासवडजवळील कुंभारवळण येथील ममता बाल सदन (बालगृह) येथे पारंपरिक वैदर्भीय पुरणपोळीच्या स्वादिष्ट भोजनाने स्वागत करण्यात आले. माईंच्या विचारांची ही सेवा-परंपरा सलग २७ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील संस्थेत वारकऱ्यांचा दोन दिवस मुक्काम होता. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड, ममता सपकाळ, सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. रविवारी (१२ जुलै) वारकऱ्यांसाठी वैदर्भीय परंपरेनुसार पुरणपोळी, चपाती, पातोळीची भाजी, कढी, पालक व कांदा भजी, वरण-भात, सलाड अशा रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री काल्याचे कीर्तन, हरिपाठ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक सोहळा रंगला. सोमवारी (१३ जुलै) सकाळी आठ वाजता “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात ही दिंडी जेजुरीमार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आश्रमातील मुलींनी पावली, फुगडी आणि अभंगांच्या गजरात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला. सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवत अनेक वारकरी भारावून गेले. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ या मूळच्या वर्धा जिल्ह्यातील, तर त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा होती. त्यामुळे आपल्या माहेरच्या भूमीतून येणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करण्याची परंपरा त्यांनी स्वतः सुरू केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतरही ही सेवा खंडित होऊ न देता, त्यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी ती अधिक समर्पित भावनेने पुढे चालविली आहे. माईंच्या संस्कारांचा, सेवाभावाचा आणि माणुसकीच्या वारशाचा हा जिवंत अविष्कार म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते.वर्धा जिल्ह्यातील दिंडी क्रमांक २१७ मधील जवळपास ३०० वारकरी मागील २७ वर्षांपासून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदाही श्री संत ज्ञानेश्वर माउली पायदळ वारकरी दिंडी मंडळ, वर्धा यांच्या वतीने दिंडी मालक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाने आणि दिंडी चालक लक्ष्मण महाराज तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. शनिवारी (११ जुलै) दुपारी ही दिंडी ममता बाल सदनात दाखल झाली. संस्थेच्या वतीने दिंडी मालक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाने यांचा सपत्नीक वस्त्र, साडी-चोळीने गौरव करण्यात आला. यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड, सौ. सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे संस्थेचे संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, पवन गायकवाड तसेच आश्रमातील मुली, कर्मचारी आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीमध्ये ह.भ.प. शुभम महाराज फुलभोगे, ह.भ.प. गौरव महाराज ठाकरे, ह.भ.प. अक्षय महाराज हरणे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खंडाते, ह.भ.प. प्रवीण महाराज मोहिजे, ह.भ.प. संजय महाराज ठाकरे, दिंडीचे विणेकरी ह.भ.प. बाबारावजी महाराज निर्मळ ह.भ.प. प्रवीण महाराज मोहिते, ह.भ.प.रामकृष्ण महाराज टेकाळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खंडाते यांच्यासह तीनशे वारकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेच्या मुलींनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.चौकट*“वारकऱ्यांची सेवा हेच माझे भाग्य”*पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९३ मध्ये पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता बाल सदन (बालगृह) या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील वारकरी दिंडीचा मुक्काम या संस्थेत होत असून, यंदा या सेवेला २७ वर्षे पूर्ण झाली. “वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. माईंच्या हातून सुरू झालेली ही माणुसकीची परंपरा अखंड सुरू ठेवणे, हेच आमचे कर्तव्य आहे. त्यांनी दिलेला सेवा, प्रेम आणि मानवतेचा वारसा श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जपत राहू. समाजानेही या सेवायज्ञात सहभागी होऊन माईंच्या विचारांची ज्योत अधिक तेजस्वी करावी, हीच आमची अपेक्षा आहे.”-- दिपकदादा गायकवाड, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र
Popular posts from this blog
Comments
Post a Comment