Skip to main content
स्व.मा.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड येथे राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. २० जुलै : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड यांच्या वतीने तसेच नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन, पुणे यांच्या सहकार्याने स्व. मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त "नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि एमएसबीटीईच्या कार्यप्रदर्शन निर्देशक आधारित शैक्षणिक कार्यपद्धती" या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी पदविका महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. एनपीडब्ल्यूएचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी शिक्षकांनी गुणवत्ता आधारित अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.कार्यक्रमाच्या पहिल्या तांत्रिक सत्रात शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रशांत अरगडे यांनी "एमएसबीटीईच्या कार्यप्रदर्शन निर्देशक आधारित शैक्षणिक कार्यपद्धती” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी एमएसबीटीईचे प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक फ्रेमवर्कनुसार अध्यापन, मूल्यमापन, दस्तऐवजीकरण आणि गुणवत्ता वृद्धीच्या प्रभावी पद्धती स्पष्ट केल्या.दुपारच्या सत्रात शासकीय फार्मसी महाविद्यालय, कराड येथील विभागप्रमुख डॉ. रेमेथ जे. डायस यांनी "नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती" या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अनुभव आधारित शिक्षण, सक्रिय शिक्षण पद्धती आणि नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रांचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याविषयी मार्गदर्शन केले.या व्याख्यानास राज्यभरातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी ऑनलाइन सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रश्नोत्तर सत्र, सहभागींचे अभिप्राय आणि चर्चेमुळे कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. हा कार्यक्रम अध्यापनातील नाविन्यपूर्ण संकल्पना, गुणवत्ता वृद्धी आणि एमएसबीटीईचे प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक आधारित शैक्षणिक उपक्रमांना चालना देणारा ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर भिसे यांनी केले. दुपारच्या सत्रातील संसाधन व्यक्तींचा परिचय व अध्यक्षीय समारोप दीपाली जगताप यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीमा केंजळे यांनी केले.या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. विशाखा गायकवाड आणि प्रा. सागर भिसे यांनी प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment