Skip to main content
बाल विकास मंदिर शाळेत बालदिंडीचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले,मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.शाळेच्या परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत शाळेतील सर्व विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, नरेंद्र महाजन , दिपक कांदळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंजुषा चोरामले , साधना राऊत व अमृता जगताप यांनी आरतीचे गायन केली.या दिंडीत विद्यार्थी , शिक्षक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. तसेच सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात टाळ, भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीची रोपे असल्याने दिंडीला खऱ्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले.या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ' झाडे लावा, झाडे जगवा' , ' पाणी आडवा, पाणी जिरवा' असा संदेश दिला."ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा, पालखी तयार करणे, अभंग गायन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वाती बोरावके यांनी आषाढी एकादशी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता जगताप यांनी केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment