Skip to main content
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या खाकीचा सन्मानस्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानकडून पालखी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : बंदोबस्तावरील २०० पोलीस बांधवांना रेनकोटचे वाटप संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शनिवारी पालखीचे सासवडमध्ये आगमन होत असून, रविवारी संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीचे सासवड येथून प्रस्थान होणार आहे. या पवित्र सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सासवडमध्ये दाखल होत आहेत. वारकऱ्यांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस, होमगार्ड आणि इतर सुरक्षा यंत्रणांतील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवेत कार्यरत आहेत.यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाही कर्तव्यावर असलेले पोलीस बांधव पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर ठामपणे उभे राहून आपले दायित्व पार पाडत आहेत. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान टिकून राहावे, त्यांच्या वारीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी स्वतःचा आराम आणि सोयींचा त्याग करून खाकी वर्दीतील हे सेवाव्रती अखंड कर्तव्य बजावत आहेत.या निःस्वार्थ सेवेला कृतज्ञतेची सलामी देत स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने पालखी बंदोबस्तावर कार्यरत असलेल्या २०० पोलीस बांधवांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. भर पावसात कर्तव्य बजावताना त्यांना थोडासा आधार आणि संरक्षण मिळावे, या भावनेतून पोलीस अधीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यासाठी गोपनीय विभागाचे रुपेश भगत यांनी प्रतिष्ठानकडे पाठपुरावा केला.यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने, "वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालतात, तर पोलीस बांधव त्या प्रत्येक वारकऱ्याच्या सुरक्षित प्रवासासाठी पावसात, उन्हात आणि रात्रंदिवस निःस्वार्थपणे उभे असतात. त्यांच्या या सेवेला मानाचा मुजरा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे," अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप सदस्य माधव शिवरकर, एपीआय वैभव सोनवणे, पीएसआय अर्चना पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन किवळे, किरण तुपे, होमगार्ड तुषार पेटकर, श्रीकांत भंडलकर हे उपस्थित होते.पोलीस बांधवांच्या सेवेला दिलेली ही मानवंदना नागरिकांच्या मनालाही भावली असून, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे पोलीस प्रशासन, वारकरी आणि नागरिकांकडून मनापासून स्वागत व कौतुक करण्यात आले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment