Skip to main content
CBSE दक्षिण विभाग-II ज्युडो स्पर्धेत हर्षित साळुंखे याचे रौप्यपदक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), सासवड येथील इयत्ता आठवी (जंजिरा हाऊस) मधील विद्यार्थी हर्षित भाऊसाहेब साळुंखे याने CBSE South Zone-II व CBSE Cluster IX ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा 2026–27 मध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या 72 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याष उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची हरियाणा येथे होणाऱ्या CBSE राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही प्रतिष्ठित स्पर्धा दि. 23 ते 26 जुलै 2026 दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यालय (TMV), मुकुंदनगर, गुलटेकडी, पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा तसेच दमण आणि दीव येथील CBSE संलग्न शाळांमधील शेकडो उत्कृष्ट ज्युडोपटूंनी सहभाग घेतला होता.स्पर्धेतील अंतिम सामन्यात हर्षितने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकासाठी कडवी झुंज दिली. मात्र केवळ एका गुणाच्या फरकाने सुवर्णपदक हुकले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याच्या जिद्द, आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि लढाऊ वृत्तीचे पंच, प्रशिक्षक व उपस्थित क्रीडाप्रेमींनी विशेष कौतुक केले.या उल्लेखनीय यशामागे शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. उदय चंद्रशेखर बोरावके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच हर्षितचे वडील श्री. भाऊसाहेब शिवाजी साळुंखे यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा, प्रोत्साहन आणि परिश्रम यांचाही या यशात मोठा वाटा आहे.हर्षितच्या या यशाबद्दल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), सासवडचे प्राचार्य श्री. अनिल भाऊसाहेब पाटील, CBSE इन्चार्ज श्रीमती रेणुका सिंग मर्चंट, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक श्री. उदय चंद्रशेखर बोरावके यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे पदाधिकारी, माजी आमदार श्री. संजय (चंदूकाका) जगताप व सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी (चंदूकाका) जगताप यांनीही हर्षितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेतही उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.हर्षितची ही कामगिरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), त्याचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक व सासवड परिसरासाठी अभिमानास्पद असून, हरियाणा येथे होणाऱ्या CBSE राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत तो शाळेचे व महाराष्ट्राचे नाव अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment