Skip to main content
पुरंदर विमानतळ बाधितांच्या जमिनीचे संमती वाटप तहसीलदार कार्यालयात सुरू; कुंभारकर कुटुंबीयांच्या खात्यात १ कोटी ८ लाख जमापहिल्या टप्प्यात उदचीवाडी येथील ३३ गुंठे जमिनीचा व्यवहार पूर्ण; १० जूनपर्यंत संमती करार करण्याचे प्रशासनाचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याची प्रक्रिया आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आहे. तहसीलदार कार्यालय पुरंदर (सासवड) येथे आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पहिल्या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देऊन या प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रशासकीय टप्पा पार पडला.पुरंदर विमानतळासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आज ७ मे रोजी तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदचीवाडी येथील शेतकरी विलास कैलास कुंभारकर व कैलास पांडुरंग कुंभारकर यांच्या ३३ गुंठे जमिनीचा संमती करारनामा प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून नोंदवण्यात आला. या जमिनीच्या मोबदल्यापोटी १ कोटी ८ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम तातडीने आरटीजीएस द्वारे कुंभारकर यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने जाहीर केलेले दर हे बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहेत. १० जून २०२६ पर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपले संमती करार पूर्ण करावेत, जेणेकरून त्यांना सक्तीच्या भूसंपादनाऐवजी संमतीने मिळणारे जास्तीत जास्त लाभ घेता येतील.एमआयडीसी कायद्यांतर्गत होणाऱ्या या भूसंपादनात शेतकऱ्यांना केवळ रोख रक्कमच मिळणार नाही, तर इतरही अनेक मोठे फायदे देण्यात येत आहेत. यामध्ये १०% विकसित भूखंडाचा ताबा, कुटुंबातील सदस्याला नोकरीत प्राधान्य आणि पुनर्वसनासाठी साडेसात लाखांपर्यंतचे विशेष अनुदान यांचा समावेश आहे. १० जूननंतर संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत 'सक्तीचे भूसंपादन' केले जाईल, ज्यात काही सवलतींना मुकावे लागू शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बँक खात्यांशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रतिनिधींचीही मदत घेतली जात आहे. कुंभारकर कुटुंबीयांप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन विकास प्रकल्पात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे.••प्रतिक्रिया••"उच्चाधिकार समितीने मंजूर केलेले दर हे अंतिम असून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आम्ही पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवत आहोत. ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे, त्यांना तातडीने मोबदला दिला जात आहे. १० जूनपूर्वी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलती मिळतील, त्यामुळे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा."— कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय).फोटो ओळ: पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रिया: तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे उदचीवाडीतील शेतकरी विलास कुंभारकर व कैलास कुंभारकर यांचा संमती करारनामा पूर्ण करताना उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment